महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघातील बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय झाला असून या अन्यायामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. साळुंखे हे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे राजकीय वर्तुळात या राजीनाम्याबद्दल चर्चा सुरू आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वी आपण तांबे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पक्षाकडून साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. साळुंखे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असताना आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविला आहे.
साळुंखे हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. थोरात यांनी साळुंखे यांच्यावर नगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. कारणे दाखवा नोटीस ला उत्तर देण्याऐवजी त्यांनी थेट राजीनामा पाठविल्याने काँग्रेस पक्ष ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी राजीनामा देऊन साळुंखे आता थेट तांबे यांच्या प्रचारात उतरण्याची चिन्हे आहेत.
तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र उघडपणे तांबे यांच्या प्रचारात आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना काँग्रेसचे किती सहकार्य लाभते हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. साळुंखे राजीनामा देऊन तांबे यांच्या सोबत जाणार असल्याची चिन्हे असल्याने उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये आता फूट पडली आहे.

