महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : बोली भाषेचा वापर कमी होऊ लागल्याने गेल्या काही वर्षात बोलीभाषा लोप पावत चालल्या आहेत. अशावेळी भाषेचा विचार मनामनात आणि घराघरात रुजविण्याची आवश्यकता असून मराठी भाषा संवर्धनासाठी आणि मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. असल्याचे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी केले.
संगमनेर तालुका वकील संघ आणि तालुका विधी समितीच्या वतीने संगमनेर न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या भाषा संवर्धन दिनी वाकचौरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. आमेठा होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश वाय. पी. मनाठकर, न्यायाधीश डी. आर. देशपांडे, न्यायाधीश एम. एम. शेख, न्यायाधीश एस. एस. बुद्रुक, न्यायाधीश एस. यु. महादर, न्यायाधीश श्रीमती एस. पी. बाबर, न्यायाधीश डी. एच. दाभाडे, न्यायाधीश जी. बी. देशमुख, न्यायाधीश श्रीमती एस. एम. वाघमारे, न्यायाधीश पी. डी. देवरे, न्यायाधीश श्रीमती एम. एम. गांगुर्डे, न्यायाधीश श्रीमती पी. आर. पालवे, न्यायाधीश श्रीमती जे. एम. गायकवाड, न्यायाधीश डी. एम. गिरी यांच्यासह वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे, मोहन फटांगरे, तात्यासाहेब गुंजाळ, अमोल घुले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
वाकचौरे म्हणाले, भाषा मृत पावली स्वातंत्र्याचे प्रेरणा मरत असते. जगातील प्रत्येक बोलीभाषा जिवंत राहण्याची गरज आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात भाषा मृत पावत असल्याचे दिसून येते. अशावेळी भाषेचा विचार सर्वत्र रुजविण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. भाषा ही प्रत्येकाच्या जीवनातील अनन्यसाधारण गोष्ट आहे. आपापल्या भाषेविषयी अभिमान बाळगणारे जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत.
आज ज्या-ज्या भाषा समृद्ध होत गेल्या त्या भाषांच्या समृद्धीसाठी जाणीवपूर्वक अभ्यासकांनी प्रयत्न केले आहेत. जगात कोणतीही एक भाषा ज्ञान भाषा असत नाही. प्रत्येक भाषेमध्ये ज्ञानभाषा बनवण्याची शक्ती सामावलेली आहे. नव्या माहिती तंत्रज्ञानाशी जोडत भाषा समृद्धतेचा होणारा प्रवास महत्त्वाचा ठरेल.
मराठी भाषा संवर्धनासाठी मुलांच्या शिक्षणाचा विचार, विचारांचे आदान-प्रदान मराठी भाषेत करण्याची आवश्यकता आहे. मराठी पुस्तके मुलांच्या हाती देत त्यांच्यात वाचन संस्कृती निर्माण करावी लागेल. शब्दकोश हे भाषेचे वैभव असून इंग्रजी भाषेमध्ये सातत्याने त्यासाठी प्रयत्न झाले आहेत. मात्र मराठी भाषेच्या शब्दकोशात आपण कमी पडत असल्याची खंत व्यक्त करत मातृभाषेतून जेवढा व्यवहार आपल्याला करता येईल तितक्या मोठ्या प्रमाणात तिचे संवर्धन होईल.
मराठी भाषेसारख्या समृद्ध भाषेचे आपण वारकरी आहोत. संत साहित्याने आपल्या मराठी भाषेचे वैभव उंचावले आहे. मराठी साहित्यातील विविधता देखील दखलपात्र आहेत. त्यामुळे मराठी भाषा संदर्भात आपण अभिमान बाळगत आपला जीवन व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन वाकचौरे यांनी केले.
जिल्हा न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी देखील यावेळी बोलताना मराठीचा वापर न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रदीप मालपाणी सदाशिव थोरात अविनाश गोडगे, बाळासाहेब राऊत नानासाहेब शिंदे विजय उगले समीर फटांगरे पंकज कडलग आदी वकिलांसह वकील संघाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सीमा काळे यांनी केले तर आभार ॲड. माया पवार यांनी मानले.
जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय एच आमेठा म्हणाले,
वकिलांनी न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने देखील न्यायालय निवाडे आपल्या भाषेत दिले जावेत असे सांगितले आहे. भाषेचा वापर व्यवहारात जास्तीत जास्त पद्धतीने झाल्यास भाषेचे संवर्धन देखील होणार आहे.

