महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच ते माझे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना कोणताही आदेश देऊ शकत नाही. मात्र त्यांच्याशी झालेल्या संभाषणानुसार ते पक्षासोबत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय आहे याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा जाहीर केलेला नसताना काँग्रेसकडूनही थोरात यांची भूमिका अशा पद्धतीने स्पष्ट करण्यात आली आहे. प्रत्यक्षात थोरात यांनी मात्र अद्याप नाशिक पदवीधर मतदार संघाबद्दल काहीही भाष्य केलेले नाही, उलट नाना पटोले यांनी थोरात पक्षासोबत असल्याचे सांगितले आहे.
पटोले शुक्रवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. उमेदवार शुभांगी पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदी यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्यासह ग्रामीण कार्यकारिणी दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या आदेशावरून बरखास्त करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार देखील किरण काळे यांच्याकडे सोपविण्यात आला असून नव्याने कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले, डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या संदर्भात निर्णय घेताना पक्षाची कोणतीही चूक झालेली नाही. पक्षाची शिस्त आणि नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया झाल्या आहेत. तांबे यांना भाजपचा पाठिंबा असेल याची कुणकुण आधीपासूनच होती. मात्र भाजपने पाठिंबा दिला की नाही हे मला माहिती नाही. बाळासाहेब थोरात सध्या आजारी असल्याने रुग्णालयात आहे. त्यामुळे ते जाहीरपणे भूमिका मांडू शकत नाही. मात्र त्यांच्याशी झालेल्या संभाषणानुसार ते पक्षासोबत आहेत. थोरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना आदेश देऊ शकत नाही. त्यांनीच पक्षाची भूमिका समजावून घेऊन त्याची कृती करणे अपेक्षित आहे. ते तसे करतील, असे मला वाटते. जो कोणी पक्षाच्या विरोधात भूमिका घेईल त्याच्यावर कारवाई केली जाईल.
या मतदारसंघात केवळ काँग्रेसलाच प्रश्न विचारले जात आहेत. भाजपला त्यांची भूमिका विचारली जात नाही. त्यांनी निवडणुकीत उमेदवार का दिला नाही. या मतदारसंघात त्यांना लायक उमेदवार मिळाला नाही का. त्यांना तांबे यांना उमेदवारी द्यायची होती तर ती का दिली नाही. अजूनही ते उघडपणे जाहीर पाठिंबा का देत नाहीत. अशा प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजे असे देखील पटोले म्हणाले.
नाना पटोले यांनी सांगितले, बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा कोणाला?
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले नगरमध्ये

