महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला असून आता शिंदे गटातील मंत्र्यानेच उद्धव आणि आदित्य ठाकरेंना शिवसेना प्रवेशाची खोचक ऑफर दिली आहे. खऱ्या खोट्या शिवसेनेतील वाद वाढीस लागला असतानाच पक्षात आता फक्त बापलेकच शिल्लक राहिल्याची टीका करत उद्धव ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
ज्यांच्या विरोधात बंड केलं, त्यांनाच आता आपल्या गटाकडे म्हणजेच शिवसेनेकडे बोलावत शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी ठाकरे यांना ही ऑफर दिली आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मिळाल्यानंतर या टीकेमध्ये आणखी वाढ झाली आहे.
संदिपान भुमरे यांनीही टीका करत ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. पक्षात आता फक्त बापलेकच शिल्लक राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आम्हाला न्याय मिळाला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे आता ठाकरे गटाकडे शिल्लक राहिलेले आमदार खासदार सुद्धा आमच्याकडे येतील.
त्यामुळे पक्षात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील. त्यांनीही आता आमच्या पक्षात याव. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव आम्हालाच मिळणार याची आम्हाला खात्री होती. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने आला आहे. कारण चाळीस आमदार, तेरा खासदारांचा, दहा अपक्ष आमदार आणि अनेक नगरसेवक ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत होते, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरात शिंदे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे.

