महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई:
पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यासाठी राज्यातील सतरा लाख कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपकऱ्यांना पाठिंबा दर्शवित नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सहकाऱ्यांसह विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. संपामुळे होणारे जनतेचे हाल लक्षात घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांची तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात तांबे यांनी राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात पाठिंबा पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सर्वच कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळातील आधार हिसकावून घेतला आहे. या अगोदर देखील अनेक आंदोलने, मोर्चे तसेच शासन स्तरावर पाठपुरावा झाला. परंतु दुर्दैवाने त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली ती कशाप्रकारे लागू केली? याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने एक अभ्यास गट पाठवावा, अशी विनंती शासनाला केली. मात्र शासन कुठल्याही प्रकारचा अभ्यास करत नाही. शासनाचे अधिकारी यामध्ये शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे तांबे यांनी संपकऱ्यांना पाठिंबा दर्शवित सहकाऱ्यांसह विधान परिषदेच्या कामावर बहिष्कार टाकला. संपामुळे होणारे जनतेचे हाल लक्षात घेऊन संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांशी सरकारने तातडीने चर्चा करून तोडगा काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांची काळजी घेणे, ही शेवटी आपली जबाबदारी आहे. या प्रक्रियेत सामान्य जनतेची, विद्यार्थ्यांची हेळसांड होणार नाही. याची देखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.

