महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर, शहरातील जोर्वे नाका भागात झालेल्या किरकोळ कारणावरील हाणामारीचे रूपांतर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत जाऊन पोहोचले. या हल्ल्यात तब्बल आठ जण जखमी झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी दिवस-रात्र घरपकड करत 16 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून जोर्वे नाका भागांमध्ये जोर्वे येथील नागरिकांवर धारदार शास्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार झाला.
यात सुनील पोपट थोरात, तन्मय राजेश दिघे, पुंडलिक पोपट दिघे, विजय मंजाबापू थोरात, अजय भिमाजी थोरात, जितेंद्र कैलास दिघे, रवींद्र नामदेव गाडेकर, बाबासाहेब शिवाजी थोरात (सर्व रा. संगमनेर, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकारामुळे संगमनेर शहर आणि तालुक्याच्या काही भागात वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दरम्यान या प्रकाराचे पोलीस दलाने गंभीर दाखल घेत कायदा सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पाऊले टाकली.
नाशिक परिक्षेत्राचे आयजी बी. जी. शेखर, पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह विविध विभागांचे डीवायएसपी आणि नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने संगमनेरमध्ये तळ ठोकत आरोपींचा शोध सुरू केला. सोमवारी दिवसभर आणि रात्रभर धरपकड करत पोलिसांनी आतापर्यंत 16 आरोपींना अटक केली असून पोलिसानी आरोपींच्या नावाबाबत गोपनीयता बाळगली आहे. 

