महाराष्ट्र संवाद न्यूज
गुरुवारी येणारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण कायदा व सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट न लागता शांततेत व उत्साहात साजरे व्हावे, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस रेकॉर्डवरील 71 जणांना गुरुवारपासून आठ दिवसांसाठी संगमनेर अकोले तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्रवेश बंदी केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
गुरुवार (ता.22 जून) ते शुक्रवार (ता. 30 जून) पर्यंत या सर्वांना संगमनेर-अकोले तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या 71 जणांवर सीआरपीसी कलम 144(2) अंतर्गत संगमनेर शहर, संगमनेर तालुका व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे प्रस्ताव प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी या सर्व रेकॉर्डवरील व्यक्तींना आठ दिवसांच्या नमूद कालावधीसाठी संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदी केली आहे.
पोलीस प्रशासनाकडून संबंधित व्यक्तींना हे प्रतिबंधात्मक आदेश बजावले जात असून या कालावधीत संबंधित व्यक्ती संगमनेर शहर संगमनेर तालुका व अकोले तालुक्यात आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे डीवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले आहे.

