महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी उपस्थित राहणे हा एक संकेत आहे मात्र सध्याच्या सरकारकडून हा संकेत पाळला जात नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरातांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याला अद्याप विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. त्यातच विरोधी पक्षनेते विना विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करण्याचे काम राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात करत असल्याचे दिसते. थोरात दररोज सभागृहात सत्ताधारी पक्षाची कोंडी करताना दिसत आहे.
मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधिमंडळात बोलताना थोरात म्हणाले, प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा या सभागृहाचा एक संकेत आहे. विधिमंडळाचे कामकाज हे सर्वोच्च आहे, या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात. उत्तरे हा सभागृहाच्या कामकाजाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आत्तापर्यंत प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्र्यांसह सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा संकेत
विधिमंडळाचे कामकाज हे सर्वोच्च आहे, या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात, त्यामुळे निदान प्रश्नोत्तराच्या तासाला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. हा संकेत आता पाळला जात नाही,… pic.twitter.com/mAzZIvSIhF
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 28, 2023
ज्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात हजर राहत नाही. त्यावेळी मंत्री देखील हजर राहत नाहीत. परिणामी सभागृहातील महत्त्वाच्या कामकाजावर आपले करोडो रुपये वाया जात आहे. आपली यंत्रणा ज्यावर चालते त्याबद्दल मोठी अनास्था दिसत आहे. निदान प्रश्नोत्तराच्या तासाला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. हा संकेत आता पाळला जात नाही. यासंदर्भात अध्यक्षांनी सरकार पक्षाला सक्त शब्दात ताकीद दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली.

