महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – बेलगाम वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आपल्या पोलीस फौज फाट्यासह सोमवारी अचानकपणे रस्त्यावर उतरल्याने कारवाई चुकविण्यासाठी वाहन चालकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस पथकाने अनेक वाहनांवर कारवाई केली.
पीआय स्वतः रस्त्यावर वाहन चालकांना शिस्त लागणार का? गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरांमध्ये वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यानंतर देखील शहरात बहुतांशी ठिकाणी वाहतुकीची कोंडी जाणवत आहे. त्यातच विशिष्ट वाहन चालकांमुळे अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अचानकपणे कारवायांचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे या कारवाया वेळी ते स्वतः रस्त्यावर उतरत असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडताना दिसते.
येथे केली कारवाई: सोमवारी पीआय मथुरे यांनी नाशिक-पुणे महामार्गावरील सह्याद्री महाविद्यालयाजवळ आपला मोर्चा वळवत तेथे अचानकपणे दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान त्यांनी टवाळखोर, बेधुंदवाहन चालक, दुचाकी वाहने चालविणारे लहान मुले, विना क्रमांकाची वाहने, फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने यांच्यावर कारवाई केली. पोलिसांकडून अचानकपणे वाहनांची तपासणी सुरू करण्यात आल्याने याची माहिती रस्त्यावरील वाहनचालकांना समजतात त्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या मार्गाने वळविला. तर काही वाहनचालक पोलिसांच्या कारवाईत अडकले.
पी आय साहेब, यांच्याकडेही जरा बघाच…
शहरात तसेच महामार्गावर रस्त्याने भरधाव वेगाने जाणारी वाहने, सायलेन्सर फोडून स्त्रिया, वृद्ध, लहान मुले, शाळकरी मुले यांच्या जवळून जाताना फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी, गर्दीतून भरधाव रेस करत धावणाऱ्या दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता निर्माण झाले असून सार्वजनिक शांततेचा वाहनांद्वारे मोठ्याने आवाज काढत अशांतता निर्माण करणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढण्याची आवश्यकता निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
सह्याद्री महाविद्यालयाजवळ सोमवारी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईची काही छायाचित्रे महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांसाठी…



