महाराष्ट्र संवाद न्यूज
एका विशेष कारवाईमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोंगाट करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत तब्बल 16 लाख 9 हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरात पोलीस एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करून दंड वसूल करत असताना संगमनेरात मात्र अशा पद्धतीने वेगवेगळे आवाज काढत सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या बुलेटस्वारांना पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत आहे.
असे निघतात आवाज: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी 1 जानेवारी ते 15 ऑगस्टदरम्यान ही कारवाई केली. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांसह काही टवाळखोरांमध्ये बुलेट, अथवा अशा आवाज करणाऱ्या दुचाकींची क्रेझ पाहायला मिळत आहे. दुचाकी घेतल्यावर मोठ्या आवाजाचे सायलेन्सर टाकून दुचाकीचा ध्वनी वाढवला जातो. काही दुचाकीत तर बंदुकीतून गोळी बाहेर येण्यासारखा आवाज काढण्यात येतो. फटाक्यांची लड फुटावी, किंवा एखादा बॉम्ब फुटावा असे आवाज या गाड्याचे येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, लहान बालकांना, रुग्णांना, वृध्दांना त्रास होत आहे. अशा पद्धतीने अचानकपणे येणाऱ्या आवाजामुळे शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा देखील आपल्या वाहनावरील ताबा सुटत असून अपघाताची शक्यता निर्माण होते.
नागरिकांची डोकेदुखी: रस्त्यावर वाहन चालवताना बुलेट अथवा अशा वाहनस्वारांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोठ्या आवाजातील सायलेंसर नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. अशा पद्धतीने वाहन चालविणे स्टेटस बनले असल्याचे दिसते. या परिस्थितीमध्ये संगमनेर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या वाहनचालकांना रस्त्यावरून अशा पद्धतीने जाण्याची मुभा दिली की काय असा प्रश्न निर्माण होतो. एरवी दुचाकीस्वारांवर कारवाई करणारे पोलीस या वाहनांवर कारवाई करताना दिसत नाही. वास्तविक पोलिसांनी असा मोठ्याने आवाज करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना त्यांच्या कानाखाली देखील तेवढाच जोरात आवाज काढण्याची आवश्यकता आहे.
मेकॅनिकचाही हातभार: शासनाने दिलेले निर्देश आणि कंपनीने दिलेल्या निकषांना डावलून खाजगी मेकॅनिककडून मोठा आवाज करणारे सायलेंसर लावण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाई कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
नियम डावलून करतात बदल: शासनाने केलेल्या सूचनेनुसार वाहन तयार केले जातात. त्यात कुठलाही बदल करू नये, अशी ताकीद दुचाकी, चारचाकी कंपन्यांकडून दिली जाते. असं असलं तरी, बाहेर व्यावसायिक सर्रास गाड्यांना नियमबाह्य साहित्य लावून देतात. त्यात सायलेन्सरचा मोठा वाटा आहे. दुचाकी, चारचाकीतून किती ध्वनी प्रदूषण बाहेर पडावे याचे निकष देण्यात आलेले आहेत. तरी हौस म्हणून सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल केला जातो.
व्यावसायिकांवर कारवाईची आवश्यकता : ज्या व्यावसायिकांनी ते साहित्य विकले, बसवून दिले त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अशा व्यावसायीकांवर कारवाई केल्यास त्याचा निश्चित परिणाम होइल. त्यामुळे पोलिसांनी अशा व्यावसायीक, दुचाकी चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

