महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – ठेवीदार आणि संगमनेरकरांचे लक्ष लागून असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांना शनिवारी या प्रकरणाची सुनावणी होऊन पुढील आदेश होईपावेतो अटक न करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
अंतरिम जामीन अर्ज: संगमनेरच्या आदर्श सहकाराला छेद देत शेतकऱ्यांची कामधेनू ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. एस. यु. कवडे यांच्यामार्फत अंतरीम जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
अटकेचा प्रयत्न: न्यायालयाने याप्रकरणी सरकारी वकिलांचे म्हणणे मागविले आहे. सरकारी वकील मच्छिंद्र गवते शनिवारी (2 सप्टेंबर) आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता होती. दरम्यान अर्जदार भाऊसाहेब कुटे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून अटक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोपीचे वकिल कवडे यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला ठेवली आहे.
पुढील आदेश होईपर्यंत: मात्र अर्जदाराच्या वकिलांचे म्हणणे लक्षात घेत न्यायालयाने सरकारी वकिलांना प्रस्तुत प्रकरणाची सुनावणी होऊन आदेश होईपर्यंत अर्जदारांना अटक न करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात अर्जदारांना दिलासा मिळाला असून तपास अधिकाऱ्यांना आरोपींना न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत अटक करता येणार नाही.
तपास अधिकारी बदलले: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पंधरा मुख्य आरोपींसह त्यांना सहाय्य करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवसांचा अवधी उलटत आला आहे. या दरम्यान मोठ्या आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करणारे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.
तपास थंडावला: प्राथमिक तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक मथुरे यांनी पाच आरोपींना अटक केली असून गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग झाल्यानंतर तपासात फारशी प्रगती झाली नसल्याचे दिसते.

