महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – महत्त्वाच्या विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्षाने केला आहे. केंद्र सरकारने केला आहे. राज्य सरकार आता करत आहे. जनतेचे लक्ष पुन्हा मुख्य विषयाकडे वेधण्याचे काम राहुल गांधी यांच्या पदयात्रेतून झाले असून या पार्श्वभूमीवर पदयात्रेच्या वर्षपूर्ती निमित्ताने देशभरात मुख्य शहरांमध्ये आज पदयात्रा काढल्याची माहिती काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
थोरात म्हणाले, 7 सप्टेंबरला राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. कन्याकुमारीपासुन सुरु झालेली ही पदयात्रा 12 राज्याची परिक्रमा करत 3560 किलोमीटर श्रीनगरपर्यंत ही यात्रा गेली. जागतिक पातळीवर उच्चांकी नोंद व्हावी, असा उपक्रम यशस्वी ठरला. संपूर्ण जगाने ही पदयात्रा बघितली.
यात्रेमागील उद्देश: ही यात्रा सुरू करण्यामागे राहुल गांधी यांचे जे उद्देश होते त्यामध्ये, देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा व्हावी हा उद्देश होता. आज लोकशाहीची होत असलेली गळचेपी, राज्यघटनेची मोडतोड, तिच्यावर होत असलेले आघात हे विषय प्रामुख्याने राहुल गांधींच्या बोलण्यात होते. याशिवाय देशात वाढणारी बेरोजगारी, महागाई हे देखील मुद्दे होते. दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असे सांगणाऱ्या भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली. महागाईच्या बाबतीत देखील गांधी यांनी आवाज उठविला.
प्रतिसाद: गांधी यांच्या पदयात्रेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वात जास्त प्रतिसाद आणि सुंदर नियोजन महाराष्ट्रात झाल्याचे राहुल गांधी यांनी मान्य केले. त्यांच्या नांदेड शेगावच्या देशातील सर्वात मोठ्या सभा ठरल्या.
परिणाम देशभरात: महाराष्ट्रातील जनतेत पुरोगामी विचार आहे. राज्यघटनेची तत्व, काँग्रेसचा विचार येथील जनतेला सहज समजतात. त्यामुळे ते काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होतात, हे जाणीवपूर्वक राहुल गांधी यांनी एका बैठकीत विशद केले. पदयात्रा काही राज्यातून गेली असली तरी त्याचा परिणाम संपूर्ण देशभरात जाणवला.
महागाई: महागाईचे स्वरूप गंभीर होत असल्याचे दिसते आहे. पेट्रोल, डिझेलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले. गॅसचे दर 350, 400 रुपयावरून 1200 पर्यंत जाऊन पोहोचले. खाद्यतेल, डाळींच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. सर्वसामान्य माणसाचे, मध्यमवर्गीयांचे जीवन या महागाईने कठीण केलं आहे.
पदयात्रा: या परिस्थितीत काँग्रेस म्हणून जनतेपर्यंत काँग्रेसचा, लोकशाहीचा विचार पोहोचविणे, आपल्या राज्यघटनेची जपवनूक करण्याकरिता जनतेला जागृत करणे. या गोष्टी पदयात्रेच्या माध्यमातून झाल्या. वर्षभर काँग्रेस यावर काम करत आहे. या पदयात्रेला आज एक वर्षाचा कालावधी झाल्याने आम्ही संपूर्ण देशामध्ये मुख्य शहरांमध्ये आज पदयात्रा काढत आहोत. ज्या तत्त्वांकरिता राहुल गांधी भांडत आहे, त्या तत्त्वांचा विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करत आहोत. या माध्यमातून राज्यात जनसंवाद यात्रा सुरू झाली आहे. नगर जिल्ह्याच्यावतीने संगमनेरमध्ये ही पदयात्रा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.


