महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – निवडून यायचे एका पक्षातून नंतर मात्र दुसऱ्या पक्षात जायचे यातून लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. राजकीय पक्षांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी संसदेने मंजूर केलेल्या पक्षांतर बंदी कायद्याचे राज्यात पालन होत नाही, अशी खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिवसेनेत फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील तरतुदीनुसार आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. न्यायालयाने आदेश देऊन चार महिने उलटून गेले तरी विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण प्रलंबित आहे.
न्याय बुद्धीने निरपेक्ष भावना ठेवून लोकशाही आणि कायदा जपायचा ही भावना ठेवून निर्णय प्रक्रिया केली तर जे-जे पक्ष सोडून गेले ते-ते कायद्यामध्ये विरोधात गेले असे होते. परंतु आता काय होते हे आम्ही उत्सुकतेने पाहतो आहे.

