महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर
आरोपींना अटक होत नसल्याने, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला असतानाच आता या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असल्याने त्याने आता अटकपूर्व जामीनासाठी औरंगाबाद हायकोर्टात धावपळ सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे. तर यातील कर्जदार आरोपी देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल दोन महिन्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर ठेवीदारांनी सुरू केलेले जन आक्रोश आंदोलन व उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच होते.
दूधगंगा अपहार प्रकरणी मुख्य 15 आरोपींसह त्यांना सहाय्य करणाऱ्या 6 जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. यातील सहा आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून त्यातील काही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. असे असले तरी या गुन्ह्याचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर या शाखेला एकाही आरोपीवर कारवाई करण्यात अद्याप यश आलेले नाही.
त्यामुळे त्यामुळे या शाखेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अपहार प्रकरणातील बहुतांशी आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने आर्थिक गुन्हे शाखा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास चालढकल करत असल्याचा आरोप होत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासात होत नसलेली प्रगती आरोपींच्या पथ्यावर पडत आहे. आरोपी पकडण्यात होणारा विलंब लक्षात घेत या प्रकरणातील आरोपी सावधपणे आपली भूमिका घेत असून टप्प्याटप्प्याने न्यायालयासमोर अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा त्याच्या कुटुंबीयासह फरार आहे. संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असताना देखील अद्यापही पोलिसांच्या तो हाती लागू शकला नाही. अथवा तपास यंत्रणेनेही त्याला अद्याप फरार घोषित केलेले नाही. त्याच्या मालमत्तेवरही तपास यंत्रणेला अद्याप टाच आणता आलेली नाही.
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींमध्ये समावेश असलेल्या कर्जदार कृष्णराव श्रीपतराव कदम श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी) यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून यावर लवकरच सुनावणी होणार आहे. याशिवाय या कुटूंबातील अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. मात्र त्यांनी अद्यापही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला नसल्याचे दिसते. कदम यांच्या जामीन अर्जावर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना व अन्य आरोपींना अटक करावी. त्यांच्या मालमत्ता ताब्यात घ्याव्यात. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासह अन्य मागण्यासाठी ठेवीदारांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले जनआक्रोश आंदोलन व उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे.


