महाराष्ट्र संवाद न्यूज
ऑगस्टमध्ये समोर आलेल्या संगमनेरच्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या देवळाली प्रवरा येथील कृष्णराव कदम आणि त्यांच्या पत्नी प्रमिला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे.
आत्तापर्यंत न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्या पाठोपाठ आता कदम दाम्पत्याचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अद्यापही या आरोपींपर्यंत पोहोचू शकले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. न्यायालयात मुख्य आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले जात असताना आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी या व्हाईट कॉलर गुन्हेगारांना हात न लावता नेमके करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या आर्थिक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी कर्जदार असलेल्या देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम यांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर ऑक्टोंबर पासून सुनावणी सुरू होती.
ठेवीदारांच्यावतीने ॲड. संदीप सहाणे यांच्या माध्यमातून ठेवेदारांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. तर सहाय्यक सरकारी वकील एम. पी. गवते यांनी या आर्थिक गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने संबंधित आरोपींकडे सखोल चौकशीची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर आरोपींच्या वतीने श्रीरामपूर येथील वकील तुषार चौदंते यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
जिल्हा योगेश मनाठकर यांनी न्यायालयासमोर झालेला वकिलांचा युक्तिवाद व म्हणणे लक्षात घेत आरोपी दांपत्याचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावला. त्यामुळे या प्रकरणातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याचे कुटुंबीय व त्या पाठोपाठ आता कदम दाम्पत्याचा अटकेचा अर्ज मोकळा झाला असला तरी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी या आरोपींना कधी अटक करतात याकडे ठेवीदारांसह सहकारातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.

