महाराष्ट्र संवाद न्यूज
‘आम्ही पोलीस आहोत, पुढे लुटमार सुरू आहे. तुम्ही तुमच्या हातातील अंगठ्या काढून खिशात ठेवून द्या’, असे सांगत दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाच्या हातातील अडीच तोळ्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
प्रभाकर संतू सोनवणे असे फसवणूक झालेल्या ६७ वर्षीय वृद्धाचे नाव असून ते भुसे ता. निफाड येथील रहिवासी आहेत. ते काही कामानिमित्त शनिवारी सिन्नरला आले होते यावेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिर्डी मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांसमोरून जात असताना लुटमारीची ही घटना घडली.

दोघा भामट्यांनी त्यांना रस्त्यात थांबवून ‘आम्ही पोलिस असून, पुढे लुटमार सुरू आहे. तुम्ही तुमच्या अंगठ्या खिशात ठेवून द्या’, असे सांगितले. त्यावर विचलित झालेल्या सोनवणे यांनी आपल्याकडील अंगठ्या काढून या भामट्यांकडे दिल्या. भामट्यांनी त्या अंगठ्या एका कागदात गुंडाळून पुन्हा सोनवणे यांच्याकडे देत तेथून निघून गेले.
थोड्यावेळाने सोनवणे यांनी कागद उघडून बघितला असता, त्यात अंगठ्या आढळून आल्या नाही. सोनवणे यांना अंगठ्या चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार आव्हाड पुढील तपास करत आहे.

