महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या मनोली येथील राजेंद्र सुभाष बोऱ्हाडे याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तीन महिने साधा कारावास व 12 हजार रुपये नुकसान भरपाई भरण्याची शिक्षा ठोठावली आहे.
२७ डिसेंबर २०१८ रोजी आरोपी राजेंद्र सुभाष बोऱ्हाडे याने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रदीप नवनाथ गुंजाळ (रा. केडगाव, अहमदनगर) यांना फोन करून शिवीगाळ केली. त्यामुळे गुंजाळ यांनी विद्युत पुरवठ्यामध्ये काही अडचण आली असेल म्हणून खात्री करण्यासाठी विद्युत सहाय्यक निखिल शेंडे यांच्याशी संपर्क करत माहिती घेतली. त्यांना देखील घटनास्थळी बोलावून घेतले. तसेच कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गुंजाळ मनोली येथे आरोपीच्या घरी गेले.
यावेळी आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे हा दारू केलेल्या अवस्थेत होता त्याने विज पुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून सरकारी काम करत असताना अडथळा आणत गुंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची दमबाजी केली. यासंदर्भात गुंजाळ यांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक उजे यांनी केला.

आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. या खटल्यामध्ये चार साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी आणि सरकार पक्षाच्या युक्तीवादादरम्यान सहाय्यक सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी केलेल्या प्रबळ युक्तिवादानंतर न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे याला भारतीय दंड विधान कलम ३५३ व ३२३ या दोन्ही गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविले.
सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून आरोपीला तीन महिने साधा कारावास व बारा हजार रुपये दंडाची शिक्षा दिली असून दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक महिना सश्रम कारावास तसेच मारहाण केल्याप्रकरणी एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून तर उर्वरित सात हजार रुपयांची रक्कम सरकार जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पैरवी अधिकारी महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली दवंगे, सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, प्रतिभा कोल्हे, नयना पंडित, अनुराधा कासार यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

