महाराष्ट्र संवाद न्यूज
राजुर : उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व कडलग इन्व्हेस्टमेंटचे डायरेक्टर सुनील कडलग यांनी केले.
सत्यनिकेतन संस्थेच्या ॲड. मनोहरराव नानासाहेब देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्यावतीने आयोजित व्यक्तिमत्व विकास समुपदेशन कार्यशाळेत संभाषण कौशल्य या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख होते. यावेळी प्रा. संदेश कासार, प्रा. सौ. बंगाळ उपस्थित होते.
कडलग म्हणाले, महाविद्यालयात येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यातील स्वप्ने पाहत असतो. मात्र, उत्तम करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य अंगीकृत करता आले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे कर्तुत्व आणि विचार व त्यांचे व्यक्तिमत्व हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एल. बी. काकडे यांनी केले. प्रा. संदेश कासार यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. व्ही. एन. गीते यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. गीते यांनी मानले.

