सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी संस्थेची वाटचाल कायम गुणवत्तापूर्ण राहिली असून, जगातील बदलांनुसार नवीन अभ्यासक्रम राबवत हे विद्यापीठ गुणवत्तेच्या जोरावर देशात अग्रगण्य ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमृत कला मंच येथे आयोजित अमृतवाहिनी विद्यापीठाच्या शानदार शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रिमोटद्वारे विद्यापीठाच्या फलकाचे व अधिकृत संकेतस्थळाचे (वेबसाईट) अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. रोहित दुबे पाटील, पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयूताई देशमुख, सिनेअभिनेत्री इशिता शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था आणि उच्च तांत्रिक शिक्षणासाठी अमृतवाहिनी संस्थेची स्थापना केली. गेल्या ४९ वर्षांच्या वाटचालीत या संस्थेचा वटवृक्ष झाला असून, राज्यभरातील पालक शासकीय महाविद्यालयांनंतर अमृतवाहिनीला पहिली पसंती देतात.
जागतिक स्तरावरील विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि विधिमंडळाने विद्यापीठाला मंजुरी दिली असून, आगामी पाच वर्षांत सर्व आधुनिक व अत्याधुनिक सुविधांसह हे विद्यापीठ अधिक सक्षमपणे उभे राहील. सध्या बी.टेक, एम.टेक आणि फार्मसी विभागाच्या कॉस्मेटोलॉजी या नवीन अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अमृतवाहिनी विद्यापीठाची स्थापना हा संस्थेच्या इतिहासातील सुवर्णक्षण असल्याचे सांगत यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे क्षेत्र अधिक व्यापक होईल असे नमूद केले. डॉ. जयश्रीताई थोरात यांनी हे विद्यापीठ संशोधन व नवनिर्मितीचे मोठे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर डॉ. रोहित दुबे पाटील यांनी विद्यापीठाच्या मान्यतेसाठी सर्वांच्या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमात डॉ. निंबाळकर यांनी विद्यापीठाची सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांनी केले, तर आभार व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी मानले.