महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – सर्रासपणे सुरू असलेल्या संगमनेरातील मटका अड्ड्यांवर अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी छापे टाकले. या कारवाईत मटक्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासह अकरा हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
दरम्यान संगमनेरमध्ये नवा मटका किंग म्हणून परिचयास आलेला शरद द्वारका शर्मा फरार झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यासह मटका अड्ड्यावर कार्यरत असलेले पंटर सिद्धांत रमेश जाधव, शुभम बाळू कालेकर, धनंजय धनराज कतारी, राजेंद्र बाबुलाल ओझा, संतोष रूपचंद पवार आणि संतोष विठ्ठल उदावंत यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या १२(A) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या या मटका अड्ड्यांवर नगर एलसीबीचे पोलीस कर्मचारी दत्तात्रेय गव्हाणे, अतुल लोटके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सचिन अडबल, किशोर शिरसाठ, आकाश काळे व अजित कुऱ्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे.
संगमनेर शहरासह तालुक्यात अनेक अवैध धंद्यांचा बोलाबाला आहे. यामध्ये जुगार अड्डे, मटका, गांजा, अवैध कत्तलखाने हे नेहमीच ऐरणीवरचे चर्चेचे अवैध धंदे आहेत. नुकताच शहरातील काही पोलिसांनी पोलीस निरीक्षकांच्या गैरहरीत एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. मात्र त्याचवेळी शहरात प्रवरा नदी काठावर सुरू असलेल्या दुसऱ्या मोठ्या जुगार अड्ड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
विशेष म्हणजे संगमनेरच्या अवैध धंद्यांवर सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यामागे आर्थिक हप्तेखोरीचे कारण असल्याचे बोलले जाते. त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणा अशा प्रकारच्या धंद्यांवर कारवाई करण्यासाठी दुर्लक्ष करताना दिसते.

शहरातील घुलेवाडी फाटा, संजय गांधी नगर, जय जवान चौक, माळीवाडा, अकोले नाका, नवघर गल्ली, चिखली येडू आई मंदिर परिसर अकोले रोड अशा विविध ठिकाणी टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

