महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे – फसवणुकीच्या एका गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी आरोपीच्या भावाकडे पाच लाखाची लाच मागणाऱ्या आणि त्यासाठी मध्यस्थी करत ४० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या वकिलाला अँटी करप्शनने पकडले असून पोलीस उपनिरीक्षक आणि वकिलाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश वसंत चव्हाण (वय ३५ वर्ष) आणि राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षक व वकिलाचे नाव आहे. पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही कारवाई केली आहे.


लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराच्या भावा विरोधात पुणे शहरातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या भावाला अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण याने पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने यासंदर्भात पुण्याच्या लाच लुचपत विभागाशी संपर्क करत तक्रार नोंदविली होती.
लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता उपनिरीक्षक चव्हाण यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच आरोपी लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांच्याकरिता चाळीस हजार रुपयांची मागणी करत सदरची लाचेची रक्कम स्वीकारताना वकील राहुल फुलसुंदर याला पकडण्यात आले.
दोन्ही लाचखोर आरोपीं विरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहे.

