महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – कार्यारंभ आदेश निघूनही प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होत नसल्याने रखडलेल्या म्हाळूंगी नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, घोडेकर मळ्याकडे जाणारा पूल भरभक्कम करावा या मागणीसाठी शुक्रवारपासून म्हाळूंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा कारणावरून हे आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. तसेच पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तातडीने शिफ्ट करण्यासंदर्भात देखील पाहणी केली. सुरुवातीला घोडेकर मळ्याकडे जाणाऱ्या पुलाची दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे.

