संगमनेर – तब्बल वर्षाचा कालावधी होत आला तरी देखील तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मात्र याच प्रकरणात तपासाच्या अनुषंगाने विविध चर्चा देखील सुरू असून यातील वस्तुस्थिती पोलीस प्रशासनाने समोर आणण्याची मागणी होत आहे.
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केळेवाडी, वडदरा (बोटा) या ठिकाणी उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय ६३) यांची त्यांच्या राहत्या घराच्या पडवीत धारदार हत्याराने छातीवर व पाठीवर गंभीर वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना एप्रिल २०२३ मध्ये घडली.

सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याने सदर व्यक्तीच्या मृत्यू झाला असावा, अशी अफवा उठवण्यात आली होती. अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर मात्र तो खून असल्याचे उघड झाले होते त्यामुळे घारगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे स्वतः करत आहेत. पोलीस निरीक्षक खेडकर आणि तपासाबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी बऱ्याच जणांचे ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी टेस्ट केली असली तरी पोलिसांना त्यातून काहीही मिळालेले नाही. त्यामुळे नेमका आरोपी कोण हे अद्यापपर्यंत पोलिसांना कळलेले नाही.
मात्र या तपासात पोलीस खरे आरोपी सोडून इतरांनाच त्रास देत असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा नव्याने कसून तपास करण्यात यावा, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

ज्या नातेवाईकांची ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली त्यांनी याबाबत पोलिसांना दोषी धरले आहे. विनाकारण आम्हाला त्रास दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याच काळात खून झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यावरून लाखो रुपये काढण्यात आले असल्याची माहिती उघड झाली. हे लाखो रुपये काढून पोलिसांना देण्यात आल्याचीदेखील चर्चा सुरू झाली. तशा आशयाच्या बातम्या माध्यमातून आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी कुठलाही खुलासा अधिकृतरित्या केलेला नाही. त्यामुळे हा संपूर्ण तपास संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

