मंगळवार दि. २६ मार्च, संगमनेर
संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. या घटनांच्या आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सात जणांना प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे.
संगमनेर-अकोले तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा यात समावेश असून अनिकेत गजानन मंडलिक (माळीवाडा, संगमनेर), संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे (कोळवाडे ता. संगमनेर), संजय अदालतनाथ शुक्ला (राजुर ता. अकोले), वरद लक्ष्मण लोहकरे (जनतानगर, संगमनेर), लाल्या उर्फ अल्ताफ शेख (कुरण ता. संगमनेर), सचिन मस्कुले व अतुल कोल्हे (दोघे रा. धांदरफळ ता. संगमनेर) अशी संगमनेरमधून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी या गुन्हेगारांचे प्रस्ताव कारवाईसाठी पाठविले होते. संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी या गुन्हेगारांना विविध विभागातून काही कालावधीसाठी हद्दपार केले आहे.
अनिकेत मंडलिक याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घरफोडी करून चोरी करणे, एटीएम मशीनचा दरवाजा तोडून पैसे चोरीचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमा जमविणे, शिवीगाळ, दमदाटी करणे आदी स्वरूपाचे गुहे दाखल असून त्याला सहा महिन्यांसाठी नगर जिल्हा, नासिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
संपत गागरे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासह कराड (सातारा) येथील तळविड पोलीस ठाणे व नांदेडच्या लोहा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून यामध्ये चाकूने वार करणे, एअरगन रोखून धमकावून खून करणे, गजाने मारहाण करून दुखापत करणे, कांद्याच्या गंजीला आग लावून नुकसान करणे, लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करणे, जबरी चोरी करणे अशा स्वरूपाच्या आठ गुन्ह्याचा समावेश असल्याने त्याला अहमदनगर जिल्ह्यासह नाशिकच्या सिन्नर व पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
संजय शुक्ला याच्यावर राजुर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, गैर कायद्याची मंडळी जमा करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, विनापरवाना दारू कब्जात बाळगणे अशा स्वरूपाचे तब्बल १५ गुन्हे दाखल असून त्याला देखील नगर जिल्ह्यासह शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
वरद लोहकरे यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एक्टिवा स्कूटर पेटवून देणे, घरात घुसून शिविगाळ दमदाटी करणे, फायटरने मारून दुखापत करणे, घरातील सामानाची तोडफोड करणे आदी स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असून त्याला देखील नगर जिल्ह्यासह शेजारच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
लाल्या शेख याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह जुन्नर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहे. यात मोटर सायकल चोरी, ट्रक चोरी, पिकअप चोरी, विनयभंग, बेकायदेशीर जमाव जमविणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्यांचा समावेश असल्याने त्याला देखील नगर जिल्ह्यासह शेजारच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सचिन मस्कुले यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडी, जीवे मारण्याचा प्रयत्न, गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल असून त्याला देखील नगर जिल्ह्यासह शेजारच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
अतुल कोल्हे यांच्यावर देखील संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे आदी स्वरूपाचे पाच गंभीर गुन्हे दाखल असून त्याला देखील सहा महिन्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यासह शेजारच्या जुन्नर व सिन्नर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी या गुन्हेगारांच्या हद्दपारिचे आदेश काढले आहे. ॲक्शन मोडवर आलेल्या प्रशासनाने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना सुरू केल्याने समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना आळा बसण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.



