सोमवार दि. १ एप्रिल
निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून महायुती व महाविकास आघाडीसह अन्य पक्षीयांच्यावतीने उमेदवारांची यादी जाहीर जाहीर केली जात असली तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील काही जागांचा तिढा अद्यापही काही केल्या संपताना दिसत नाही. महायुतीच ९ तर मविआच १३ जागांवर अडलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी ४८ जागांवर उमेदवार देण्याचे प्रक्रिया सर्वच पक्षांकडून सुरू आहे. यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित असला तरी काही जागांवर मात्र अद्यापही उमेदवार निश्चित होत नाहीये. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरूच असून महायुतीचे अजूनही ९ जागांवरचे उमेदवार ठरलेले नाहीत. तर महाविकास आघाडीचे १३ जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सोबत युतीची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत वंचितच्या १९ उमेदवारांची यादी देखील जाहीर केली पण महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही निश्चित होताना दिसत नाही. महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष अडलेल्या जागांवर एकमेकांच्या दावा करत असल्याने या जागांचा अद्यापही निर्णय होताना दिसत नाही. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे १८ दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यासाठी फक्त २५ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. प्रचारसभा, शक्ती प्रदर्शन हे तर फार लांब आहेत, अजून उमेदवारच ठरताना दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे गेल्या १० वर्षांपासून खासदार आहेत. पण तरीदेखील त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही.
महायुतीचे ‘या’ जागांवर उमेदवार ठरेना…
१) मुंबई उत्तर मध्य, २) मुंबई दक्षिण, ३) पालघर, ४) कल्याण, ५) ठाणे, ६) धाराशिव, ७) रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ८) संभाजीनगर व ९) नाशिक

मविआचे ‘या’ जागांवर उमेदवार ठरेना…
१) धुळे, २) जळगाव, ३) रावेर, ४) अकोला, ५) मुंबई उत्तर, ६) मुंबई उत्तर मध्य, ७) पालघर, ८) भिवंडी, ९) कल्याण, १०) जालना, ११) बीड, १२) माढा व १३) हातकणंगले.

