गुरूवार दि. ४ एप्रिल
भ्रष्टाचारी नेते भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत असतात. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा बंद पडतात. भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोप करण्यात आलेल्या २५ नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. यातील तिघांना तर पूर्णतः क्लीन चिट मिळाली तर २० जणांच्या चौकशा थांबल्या आहेत.
पार्टी विथ डिफरन्स, न खाऊंगा न खाणे दूंगा! या भाजपाच्या भूमिकेचा बुरखा यामुळे फाटला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने भाजप प्रवेशानंतर स्वच्छ झालेल्या नेत्यांसंदर्भातील सविस्तर वृत्त दिले आहे.
२०१४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षातील विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अनेक जण तुरुंगात देखील गेले. यातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या विरोधी पक्षातील २५ नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे यातील सर्वाधिक नेते महाराष्ट्रातील आहेत.
‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार या यादीतील २५ पैकी निम्मे म्हणजेच डझनभर १२ नेते महाराष्ट्रातील आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या प्रत्येकी चार नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.


