शनिवार, दि.२० एप्रिल
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे १० कोटींचे मालक असून वाकचौरे पती-पत्नीत पत्नी सरस्वती संपत्तीच्या बाबतीत वरचढ आहे.
वाकचौरे यांनी शुक्रवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आपल्या मालमत्तेचे शपथपत्र जोडले आहे. या शपथपत्रांत वाकचौरे दांपत्याकडे सुमारे दहा कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. शंभर तोळे सोने या दाम्पत्याकडे आहे.
संपत्तीचे विवरण पुढील प्रमाणे:-
उमेदवार वाकचौरे यांच्याकडे पन्नास तोळे सोने आणि पाच किलो चांदी असून त्याचे बाजार मूल्य तेहतीस लाख बारा हजार पाचशे रुपये दाखवण्यात आले आहे. तर वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती यांच्याकडे देखील पन्नास तोळे सोने आणि अडीच किलो चांदी असून त्याचे बाजार मूल्य एकतीस लाख एकतीस हजार दोनशे पन्नास रुपये एवढे दाखविण्यात आले आहे.
वाकचौरे यांच्याकडे सात लाख रुपये किमतीचे एक चार चाकी वाहन असून त्यांच्या पत्नीकडे चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एक चार चाकी वाहन आहे.
वाकचौरे दाम्पत्याकडे १ कोटी ८६ लाख ८६ हजार रुपये मूल्य असलेली शेत जमीन आहे. निमगाव कोऱ्हाळे, निंबळक, पिंपरी निर्मळ, चांदेकसारे व शिर्डी येथील शेत जमिनीचा यात समावेश आहे. वाकचौरे यांच्याकडे खंडाळा येथे एक बिगर शेती प्लॉट, पत्नीच्या नावे निमगाव जाळी, धामोरी, शिर्डी (घर) साकुरी व कांगोणी येथे दोन प्लॉट या बिगर शेती मालमत्तेची किंमत १ कोटी ४० लाख २२ हजार ४९० रुपये एवढी दर्शविण्यात आली आहे.
आर्थिक संपत्ती:-
भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे २३ लाख ५२ हजार ४४९ रुपयांची रोकड आहे.
रोकड सरस्वती वाकचौरे यांच्याकडे ४६ लाख ०८ हजार १०५ रुपयांची रोकड आहे.
२२ लाख १४ हजार रुपयांच्या बँकेतील ठेवी आहेत. याशिवाय विविध कंपन्यांचे शेअर्स देखील त्यांच्याकडे आहे.


