मंगळवार, दि.२३ एप्रिल
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार पर्यंत चार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या सहावर गेली. तर आणखी ११ जणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नामनिर्देशन पत्र नेले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी, महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे या दोन प्रमुख उमेदवारांशिवाय चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी देखील अर्ज दाखल केले होते.
तर मंगळवारी भारत संभाजी भोसले (समता पार्टी) व नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी) या २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते बुधवारी (दि.२४ एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या मतदारसंघात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत.


