अनंत पांगारकर | शुक्रवार, दि.२६ एप्रिल
शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी नवी खेळी खेळली गेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाशी नामसाधर्म्य असलेले उमेदवार मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही खेळी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडली आहे. ठाकरे गटाकडून या मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. वाकचौरे यांच्या उमेदवारी विषयी मतदार संघात मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण असताना आता वाकचौरे यांच्या नावाशी मिळताजुळता उमेदवार शेवटच्या क्षणी मैदानात उतरला आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्याबरोबर आता या मतदारसंघात भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे या नावाचा अपक्ष उमेदवार मैदानात उतरला आहे.
अशाच पद्धतीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या विरोधात निलेश साहेबराव लंके या नावाचा अपक्ष उमेदवार मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करा महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे.
मतदान यंत्रात या उमेदवारांची नावे कशा पद्धतीने येतात यावर देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चिंता आहे. उमेदवारांच्या सारख्या नावामुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. आता ही खेळी सत्ताधारी महायुतीने खेळली की अन्य कोणी योगायोगाने या नावाचे उमेदवार मैदानात उतरवले याबाबत मात्र मतदारसंघात चर्चा सुरू आहे.



