
शनिवार, दि.२७ एप्रिल
अनेक दिवसांपासून वेटिंगवर असलेल्या पुनम महाजन यांच्या तिकीट कापत भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ कायदे तज्ञ उज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्यासोबत निकम यांची लढत होईल.
भाजपने शनिवारी उमेदवारांची पंधरावी यादी जाहीर केली. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पुनम महाजन इच्छुक होत्या. मात्र भाजपकडून महाजन यांना शेवटपर्यंत वेटिंगवर ठेवत अनपेक्षितरित्या उज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाजन यांना मतदारसंघात असलेला मोठ्या प्रमाणातील विरोध हे त्यांचे तिकीट कापण्यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. भारतीय जनता पक्षासाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात असल्याने या मतदारसंघातून उज्वल निकम यांना संधी देण्यात आली असून निकम हे प्रसिद्ध कायदे तज्ञ आहेत. मुंबईवरील हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला आरोपी अजमल कसाब विरुद्धच्या केस मध्ये निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम बघितले होते. या खटल्यात कसाबला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. याशिवाय गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्याकांड आधी हाय प्रोफाईल खटलात देखील निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम बघितले आहे.
निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या पूनम महाजन कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.



