सोमवार, दि. ६ मे
नासिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असलेले शिवसेनेचे विजय करंजकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाठोपाठ शिंदे यांनी त्यांच्यावर उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उबाठा शिवसेना गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत असताना नासिक लोकसभा मतदारसंघात रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या. रविवारी विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबईमध्ये शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
नासिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले विजय करंजकर यांना डावलत उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे करंजकर नाराज होते. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या देखील चर्चा समोर येत होत्या.
रविवारी करंजकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी करंजकर यांच्यावर उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षप्रवेशा बरोबरच पक्ष संघटनेत करंजकर यांच्यावर मोठी जबाबदारी देखील दिली गेली आहे.


