बुधवार, दि. ८ मे
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ गुरुवारी कोपरगावमध्ये वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांची सभा होत आहे. शिर्डीतून आपलाच विजय निश्चित या विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांना वंचितच्या उमेदवाराने चांगलेच जेरीस आणल्याचे दिसत आहे.
दोन्ही आजी-माजी खासदारांच्या तुलनेत रूपवते मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरत असून शिर्डीतील पहिल्या महिला उमेदवार म्हणून मतदार दोघात तिसरा असा विचार करताना दिसत आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची मदार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. मतदार संघात निवडणुकीदरम्यान मिस्टर इंडिया म्हणून परिचित झालेले लोखंडे निवडणुकीनंतर परत दिसतील की नाही याची साशंकता आहे. तर प्रत्येक निवडणुकीला पक्ष बदलाचा नवा अनुभव असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची मदत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. वाकचौरे यांच्या पक्षाचे कमी आणि थोरात यांचे कार्यकर्तेच अधिक वाकचौरे यांचा प्रचार करताना दिसत आहे.
आजी माजी खासदारांच्या पक्षाचे पदाधिकारी शोधूनही प्रचारात सापडताना दिसत नाही. दोन्ही उमेदवार लादले गेल्या असल्याच्या भावनेने अनेक जण या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत नाही, असे असले तरी या दोन्ही उमेदवारांना विजयाचा भलताच आत्मविश्वास दिसतो.
याचाच फायदा मतदार संघात वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते घेताना दिसत आहे. दोन्ही उमेदवारांच्या बालेकिल्लातील मतांचा विभाजन करण्यासाठी त्या सज्ज झाल्या असून दोघांच्या भांडणात तिसरा असे चित्र तर या मतदारसंघात दिसणार नाही ना अशीही शंका व्यक्त होत आहे. असे घडले तर रूपवते यांच्या रूपाने या राखीव मतदार संघात एकमेव महिला खासदार असतील.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर अकोले तालुक्यात दगडफेकीचा प्रकार समोर आल्यानंतर मतदार संघातील राजकीय गणित बदलू लागले आहे. आजी-माजी खासदारांना संधी दिल्यानंतर आता दोघांनाही कंटाळलेले मतदार तिसरा पर्याय मिळाल्याने रुपवते यांच्या मागे उभे राहताना दिसत आहे.
प्रकाश आंबेडकरांपाठोपाठ सुजात आंबेडकरांची गुरुवारी सभा…
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची सभा श्रीरामपूरमध्ये झाल्यानंतर आता रूपवते यांच्या प्रचारार्थ गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता कोपरगावमध्ये सुजात आंबेडकर यांची विजय संकल्प सभा होत आहे. आजी-माजी खासदारांना मोठ्या नेत्यांचे पाठबळ मिळत असताना उमेदवारांची ताकद मात्र कमी पडत आहे. अशा स्थितीत रूपवते प्रचारात सध्यातरी पुढे सरकल्याचे चित्र आहे. आंबेडकरांपाठोपाठ सुजात आंबेडकरांची सभा रुपवते यांच्यासाठी किती फायद्याची ठरते हे मतमोजणी नंतर समोर येईल.


