गुरुवार, दि. ९ मे
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर अकोले तालुक्यात दगडफेक करत हल्ल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता संगमनेर तालुक्यातील पठार भागात त्यांचे प्रचाराचे बॅनर अज्ञाताने फाडल्याचे समोर आले आहे.
शिर्डीत लोकसभा निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे या आजी-माजी खासदारांसह उत्कर्षा रुपवते निवडणूक लढवत असून सुरुवातीला सरळ आणि दुरंगी वाटणारी निवडणूक रुपवतेंमुळे तिरंगी बनली आहे. त्यामुळे लाटेवर आपलाच विजय निश्चित असं मानणाऱ्या आजी-माजी खासदारांना धडकी भरली असल्याचे दिसते.
रूपवते यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर मतदार संघात त्यांच्या सहानुभूतीत वाढ झाली आहे. असे असतानाच तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या रूपवते यांचे निवडणूक बॅनर फाडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
उत्कर्षा रुपवते म्हणाल्या… लेकिन आपुन रुकेगा नही साला!
प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे अमाप पैसा आणि सत्ता आहे, पण जनतेचा पाठिंबा नाही. माझ्याकडे फक्त जनतेचा पाठिंबा आहे. माझे प्रतिस्पर्धी समोर येऊन मला थांबवू शकत नाही, म्हणून ते कधी रात्री माझ्या चालत्या गाडीवर दगडफेक करतात तर कधी माझे पोस्टर फाडून टाकतात. लेकिन आपुन रुकेगा नही साला!


