अहमदनगर – शिर्डी
अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर – शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून मोबाईलला डीपी, स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या “डीपी बोले तो… डेमोक्रेसी पार्टिसिपेशन” या उपक्रमाचे विमोचन जिल्हा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले.
यांची उपस्थिती… यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
असा आहे उपक्रम… मोबाईलचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जातो. डीपी ठेवणे, स्टेटस बदलणे व विविध रिंगटोन लावणे या सामान्य माणसाच्या आवडत्या सवयी आहेत. या गोष्टीच औचित्य साधून “डीपी बोले तो.. डेमोक्रेसी पार्टिसिपेशन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रिंगटोन व कॉलर ट्यून लावण्यासाठी भारत निवडणूक आयोग यांचे “हम भारत के मतदाता है ” व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे “ये पुढे, मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर” ही दोन गीते क्यूआर कोड, लिंक व ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात अहमदनगरकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या क्रमांकावर करा संपर्क… त्याचबरोबर डीपी व स्टेटस ठेवण्यासाठी “मी भारत आहे, मी महाराष्ट्र आहे मी, अहमदनगर आहे व मी मला मतदान करणार” अशा आशयाचे डिझाइन्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्यांना डीपी, स्टेटस व गाणे हवे आहे त्यांनी देशातल्या पहिल्या अहमदनगर स्वीप केअर असलेल्या ९००२१०९००३ या व्हाट्सअप क्रमांकावर स्वतःचे संपूर्ण नाव पाठवावे.
उपक्रम प्रशंसनीय व अनुकरणीय… “अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचे उपक्रम देशात व राज्यात गौरवले जात आहेत अशा उपक्रमांच्या माध्यमातून निश्चितच मतदानाचे महत्त्व कळून मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. डीपी, स्टेटस यासारख्या घटकांमध्ये आपणास रस असतो. आपण इतरांचेही डीपी स्टेटस पाहतो. या वैशिष्ट्याचा या उपक्रमात निश्चितच फायदा होणार आहे. प्रशासनाची दोन्ही गाणी अत्यंत प्रेरणादायी आहेत. यांसारखे उपक्रम प्रशंसनीय व अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले .
यांचे सहकार्य… या उपक्रमासाठी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, निवडणूक तहसीलदार प्रदीप पाटील, जिल्हा मतदार दूत डॉ. अमोल बागुल, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी यांच्यासह स्वीप समिती सदस्यांचे सहकार्य लाभले.


