शनिवार, दि. ११ मे
नोकरी लावून देण्याचे आम्हीच दाखवत पाच जणांनी नऊ लोकांना ४१ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय लक्ष्मण कारखानीस, तुषार धनंजय कारखानीस, रोहित धनंजय कारखानीस यांच्यासह आणखी दोघांचा आरोपींमध्ये समावेश असून त्यांच्याविरुद्ध पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात संदीप बबन इंदलकर (वय ४१ वर्ष, रघुकुल नगरी, औंध रोड, खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून रोहित कारखानीस याला नोकरी लावण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगत धनंजय कारखानीस आणि तुषार कारखानीस फिर्यादीकडून १ लाख ८७ हजार रुपये घेतले होते. मात्र त्यांनी मुदतीत हे पैसे फिर्यादीला परत केले नाही.
त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये कोविडमुळे कोल इंडियात जागा रिकामा झाल्या असून त्या भरावयाच्या आहे, तेथे तुमच्या मुलीला नोकरी लावतो, असे सांगत इंदलकर यांच्याकडून १६ लाख ६३ हजार रुपये घेतले. अशाप्रकारे इंदुलकर यांच्यासह नऊ जणांना आरोपींनी ४१ लाख १८ हजार ५०० रुपयांना गंडा घातला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.


