मंगळवार, दि. १४ मे
मुंबई : कांदिवली येथे व्यावसायिकाची पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींनी ६० लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारल्यानंतर व्यावसायिकाची सुटका केली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी व्यावसायिकाच्या चालकासह तिघांना अटक केली.
तक्रारदार बोरिवली येथील रहिवासी असून त्यांचे अंधेरी येथे कार्यालय आहे. बुधवारी ८ मे रोजी काम संपवून मित्रांसह कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. कांदिवली येथे त्यांचा मित्र मोटरगाडीतून उतरला. गाडीचे दरवाजे बंद करण्यापूर्वीच दोन तरुण आले व ते जबरदस्ती गाडीमध्ये बसले. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून मोटरगाडी दहिसरच्या दिशेने घेऊन जाण्यास सांगितले. तेथे व्यावसायिकाला मारहाण करून पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली.
अखेर व्यावसायिकाने ६० लाख रुपये चालकाला बोरिवली येथील घरी पाठवून आणले. ती रक्कम आरोपींना दिल्यानंतर ते काही अंतरावर मोटरगाडीतून खाली उतरले. व्यावसायिकाने चार दिवसानंतर समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
प्राथमिक तपासाच्या आधारे समतानगर पोलिसांनी व्यावसायिकाचा चालक सागर पवार (३६) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पवारसह त्याचे साथीदार किरण भोसले (३४) व मंगेश कारांडे (३५) यांना अटक केली आहे.


