रविवार, दि. १९ मे
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केल्याचा प्रकार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये समोर आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी भामाठाण येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टरसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
श्रीरामपूर तालुक्यातील कमालपुर येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांना शुक्रवारी (दि. १७) मिळाली होती. त्यामुळे कारवाईसाठी त्यांच्या पथकातील हवालदार प्रशांत रणनवरे, वैभव काळे, पठाण, वारे आदी कमालपुरमार्गे दुपारी एक वाजता घटनास्थळी पोहोचले होते. तेथे वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्यांना आढळून आले.
यावेळी हवालदार काळे यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. मात्र त्याच दरम्यान चालक संतोष दळे यांच्या ताब्यात असलेल्या ट्रॅक्टर ज्ञानेश्वर बनसोडे यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. यावेळी दोघांनी संगनमत करत काळे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. काळे तात्काळ तेथून बाजूला झाल्याने बचावले. त्यामुळे आरोपी ट्रॅक्टर घेऊन पळून गेले.
त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकास पकडून आणले. त्यांच्या ताब्यातील दोन्ही वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. पोलीस हवालदार काळे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर देविदास बनसोडे, सुभाष कडूबा दळे आणि सोमनाथ कोंडीराम सुरासे (तिघे रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध शासकीय वाळू चोरी, पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
पालकमंत्री विखे पाटलांच्या वाळू धोरणाला आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हरताळ…
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यातील वाळू तस्करीवर सतत भाष्य करणाऱ्या विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी नवे वाळू धोरण आणले. मात्र या वाळूधोरणाचा त्यांच्या जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला असल्याचे दिसते. शासकीय वाळू मिळत नसले तरी वाळू तस्करांसाठी मात्र नदीपात्र मोकळे पडले आहे. त्यामुळे आता वाळू तस्करी करणारे हे नेमके समर्थक कोणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.


