मंगळवार, दि. २१ मे
गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यामध्ये हजर राहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स काढले आहे. यामुळे राहुल गांधी यांना रांचीच्या न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण… कोणताही खुनी व्यक्ती काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही. काँग्रेसवाले अशा व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारू शकत नाही, हे फक्त भाजपमध्येच शक्य आहे. असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये झालेल्या दिल्लीतील अधिवेशनात म्हटले होते. गांधी यांच्या या वक्तव्याला अपमानास्पद ठरवत भारतीय जनता पक्षाचे नेते नवीन झा यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात रांचीच्या दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. नवीन झा यांनी याचिकेत म्हटले आहे की, राहुलच्या वक्तव्यामुळे ते दुखावले गेले आहेत आणि पक्षाची प्रतिमाही डागाळली आहे, त्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस नवीन झा यांनी दिली होती मात्र माफी न मिळाल्याने त्यांनी ही याचिका दाखल केली.
न्यायालयाने काढले समन्स… दरम्यान या याचिकेची दखल घेत रांची न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स काढले असून याप्रकरणी ११ जूनला पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहावे लागेल.


