सोमवार, दि. २७ मे
व्हाट्सअप ग्रुपवर लोकमत न्यूजमधील व्हिडिओ टाकत त्याखाली टाकलेल्या एका मेसेजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मेसेज टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अमोल चंद्रभान पेरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयुब लालखान पठाण (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पठाण याने गावातील एका व्हाट्सअप ग्रुप वर लोकमत न्यूजमधील सुमारे दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकत त्याखाली “अखेर डाव साधलाच. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील खाजगीकरण केलय. रद्द केलेला जीआर पुन्हा काढण्यात आला आहे. आरक्षण संपवण्यात आले. राम मंदिर, मराठा आरक्षण आंदोलन चालू असताना संपूर्ण खाजगीकरण करून टाकले आहे. तरुणांनो घ्या रामाचे नाव आणि जावा पोतडी गुंडाळून वनवासाला” अशी पोस्ट केली होती.
प्रभू श्रीराम बद्दल आक्षपार्ह मजकूर असलेल्या या मेसेजमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. या कारणावरून अमोल पेरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे करत आहे.


