मंगळवार, दि. ४ जून
गेल्या काही दिवसापासून लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली आहे. मतमोजणीनंतर देशात सत्ता कोणाची हे स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी व सत्ताधारी महायुतीमध्ये तर, देशात इंडिया व सत्ताधारी एनडीएमध्ये लढत झाली. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर त्या त्या मतदारसंघात राज्यात आणि देशात कोणाचे वारे होते याविषयी मतदारात चर्चा सुरू होती.
दरम्यान देशातील सातवे टप्प्याचे मतदान संपल्यानंतर पाठोपाठ विविध सर्वेक्षणाचे एक्झिट पोल समोर आले. आज मात्र या एक्झिट पोलसह सर्वच उमेदवारांचे परीक्षा होणार असून त्याचे निकाले लगेच समोर येणार आहेत. एक्झिट पोल किती खरे किती खोटे हे देखील यातून समजणार आहे.
१८ व्या लोकसभा निवडणुकीत ५४३ जागांसाठी ६ राष्ट्रीय पक्षांसह ७४४ प्रादेशिक पक्षांसह अपक्ष असलेल्या ८,३६० उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. यात राष्ट्रीय पक्षाचे १६%, प्रादेशिक पक्षाचे ६% आणि अपक्षांच्या रूपाने ४७ टक्के उमेदवार आपले नशीब आजमावत असल्याची माहिती समोर आली. १९९६ च्या निवडणुकीनंतर प्रथमतः एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रीय पक्षापैकी सर्वाधिक बहुजन समाज पक्षाचे ४८८ उमेदवार, त्या पाठोपाठ भाजपचे ४४१ उमेदवार, काँग्रेसचे ३२८, माकपचे ५२, आम आदमी पक्षाचे २२ आणि नॅशनल पीपल्स पक्षाचे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहे.


