गुरुवार, दिनांक ६ जून २०२४
राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जाचाला कंटाळून भाजपातील अनेक नेत्यांनी निलेश लंके यांना निवडणुकीत मदत केली, असा गौप्यस्फोट करत ज्याप्रमाणे राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसरी जबाबदारी देण्याची मागणी पक्षाकडे करण्यात आली, त्याप्रमाणे जिल्ह्यातील दोन्ही जागा गमावल्याने पालकमंत्र्यांनीही अशीच पक्षशिस्त व नैतिकता दाखवावी असा सल्ला देत अप्रत्यक्षपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली.
माध्यमांशी संवाद … नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयानिमित्त ‘मविआ’च्या पदाधिकाऱ्यांनी परस्परांना बुंदीचे लाडू भरवले. त्यावेळी फाळके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यांची उपस्थिती … यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्यासह संभाजी कदम, किरण काळे, शौकत तांबोळी, प्रताप शेळके, अशोक बाबर, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, बाळासाहेब बोराटे, सीताराम काकडे, राजू आघाव, किसनराव लोटके, विलास उबाळे, दत्ता जाधव, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.
फाळके म्हणाले, सामान्यांना त्रास देण्याचे काम पालकमंत्र्यांकडून होत आहे. आम्ही अतिक्रमणांच्या विरोधातच आहोत. मात्र सुप्यासारखी अतिक्रमणे जिल्हाभरात आहेत व ती त्यांना दिसत नाहीत. सुपे येथे सूडबुद्धीने कारवाई झाली. सामान्यांना त्रास दिल्यावर त्यांच्यातून उद्रेक होतो, हे भाजपच्या काही जणांनी दाखवून दिले आहे व त्यांनी लंके यांना साथ दिली.
राजीनामा मागण्याचा अधिकार बाळासाहेब थोरात यांना … आम्ही विजयाने हुरळून जाणार नाही, पण त्यांना पराभव पचवता येईल की नाही, हा प्रश्न आहे. मात्र, यापुढे त्यांनी सामान्यांना त्रास देऊ नये. ते कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांना आहे व ते त्यावर भाष्य करतील, पण फडणवीस यांच्यासारखी शिस्त व नैतिकता पालकमंत्री दाखवतील का, असा माझा प्रश्न आहे.
तुतारी पिपाणीचा योगायोग … तुतारी वाजवणारा माणूस या पक्षचिन्हाशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह मिळालेल्या उमेदवाराला ४४ हजार ५०० मते मिळाली. १७ पेक्षा जास्त उमेदवार असल्याने दोन मतदान यंत्रे होती, पहिल्या यंत्राच्या दुसऱ्या क्रमांकावर नीलेश लंके यांचे नाव होते तर दुसऱ्या यंत्राच्या दुसऱ्या क्रमांकावर तुतारीशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह होते. हा केवळ योगायोग होता का, असा प्रश्न उपस्थित करत राजेंद्र फाळके यांनी, त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही. त्यामुळे त्याला मिळालेल्या मतांपैकी किमान ४० हजार मते लंके यांचीच आहेत, असा दावा केला.

संगतीचा परिणाम …
शिवाजी कर्डिले ज्यांच्याबरोबर जातात, तो खासदार पराभूत होतो, असे भाकीत आपण निवडणुकीपूर्वी केले होते. ते खरे ठरले. यापूर्वीच्या निवडणुकीत विखे हे कर्डिले, कोतकर, जगताप यांच्याविरोधात होते. त्यावेळी ते निवडून आले. आता विखे त्यांच्याबरोबर होते तर त्यांना निवडणुकीत त्याचा परिणाम भोगावा लागला, असा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गाडे यांनी केला.

