रविवार, दिनांक ९ जून २०२४
बारावी पास झाल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी केजच्या रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.
बीडच्या लाचलुचपत शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. धनराज सखाराम सोनवणे असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.
तक्रारदाराने बारावी पास शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत मिळण्यासाठी शाळेकडे अर्ज केला होता. या अर्जावरून शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी मुख्याध्यापक सोनवणे यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत शाखेचे बीडचे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमंत गोरे, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहत्रे, स्नेहल कुमार कोरडे या अधिकाऱ्यांनी सापळा लावत तक्रारदाराकडून तीन हजार रुपये स्वीकारताना मुख्याध्यापक सोनवणे याला पकडले. मुख्याध्यापकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


