बुधवार, १९ जून
संगमनेरकरांचे लक्ष लागून असलेल्या आणि बहुचर्चित ठरलेल्या एका न्यायालयीन खटल्यात न्यायाधीशांनी माजी उपनगराध्यक्षासह आठ सामाजिक कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ९ वर्ष ४ महिने हा खटला न्यायालयात सुरू होता.
प्रवीण गंगाधर मंडलिक, कल्पेश सोमनाथ पोगुल, सोमनाथ सुरेश गायकवाड, नरेंद्र रामेश्वर ओझा, लखन दीपक जेधे, सुदर्शन दत्तू इटप, राहुल शशिकांत नेहूलकर व शैलेश राजगोपाल कलंत्री या आठ जणांचा निर्दोष सुटलेल्यात समावेश आहे.
९ जानेवारी २०१४ रोजी संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरून जाणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना जय जवान चौकात दुपारी दोन वाजेच्या सुमारास १०-१२ जणांच्या घोळक्याने अडवत दुचाकीवर पेट्रोल टाकत, दुचाकीवरील दोघांना खाली खेचत हॉकी स्टिक, लोखंडी गज व लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. दोघा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी या गुन्ह्याचा तपास करत प्रवीण गंगाधर मंडलिक, कल्पेश सोमनाथ पोगुल, सोमनाथ सुरेश गायकवाड, नरेंद्र रामेश्वर ओझा, लखन दीपक जेधे, सुदर्शन दत्तू इटप, राहुल शशिकांत नेहूलकर व शैलेश राजगोपाल कलंत्री या आठ आरोपीं विरोधात भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, १४८, ३४१, ३२४, ४३५, ४२७ सह १४९ अन्वये संगमनेरच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. ४ थे सह दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.
आरोपींच्यावतीने ॲड. जे. एच. वामन, ॲड. विवेक बोराडे, ॲड. पी. आर. राहणे, ॲड. विशाल जाधव, ॲड. संतोष इटप यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता श्रीमती एम. ए. पवार यांनी काम बघितले. तर फिर्यादी नईम आयुब शेख, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हबीब रऊफ काझी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप भाऊसाहेब कुटे, तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्यासह पंच आणि साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविण्यात आल्या.
न्यायाधीश जी. बी. देशमुख यांच्यासमोर झालेल्या या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपींवरील आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही. आरोपींचे वकील आणि सरकार पक्षाचे वकील यांच्या युक्तिवादानंतर, साक्षीदारांच्या साक्षीनंतर न्यायालयाने आपली निरीक्षणे नोंदवत सर्वच्या सर्व आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.



