बुधवार, १९ जून
न्यायालयीन कामकाजा दरम्यान ओळख निर्माण करत वृद्धत्व आणि आजारपणाचा गैरफायदा घेत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या वृद्ध समाजसेविकेची जमिनीच्या व्यवहारात दोन कोटीची फसवणूक करत दहा लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यात एका वकिलासह सहा जणांवर भादवि ४०६, ४२०, ३८५, ३८६, ३८७, ५०६, १२० (बी) ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲड. रवी सुरेश जाधव (रा. लेन नं. ५, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे, चिंतामणी अंकुश पोकळे (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरूणराज संजीव कुसाळकर, करण संजीव कुसाळकर (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध) आणि अभिजीत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात तारामती सदानंद पाठक (वय ७५, रा. सॅलेसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पाठक यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या काही मिळकतीन संदर्भात पुणे न्यायालयात खटला प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने त्यांचे शिवाजीनगर न्यायालयात नियमित जाणे-येणे होत होते. या दरम्यान ॲड. रवी सुरेश जाधव याने त्यांच्याशी ओळख वाढवत विश्वासाचे नाते निर्माण करत खटल्यात मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्यांच्या एका दरखास्तीचे काम जाधव यांच्याकडे दिले. या खटल्यात जजमेंट डेबटर कुसाळकर यांना भेटलो असून प्रकरण लवकरच दिखाने लागेल असे जाधव याने फिर्यादीला सांगितले.
तसेच आपले पुण्यातील अनेक बिल्डर, विकसकांशी चांगले संबंध असून तुम्हाला तुमच्या मिळकती विकावयाच्या असतील तर अतिशय चांगल्या दरात त्या मी विकून देऊ शकतो. जर तुम्ही हे काम मला दिले तर मी तुम्हाला सदर मिळकतीचा भरघोस मोबदल्यासह एका शांत व सोयीस्कर जागी एक टू बीएचके फ्लॅट व ड्रायव्हर किंवा ड्रायव्हरसाठी पैसे देईल, असे सांगून विश्वास संपादन केला. व कोविडच्या कालावधीत मिळकती संदर्भातील सर्व कागदपत्रे घेतली.
काही दिवसांनी पाठक यांनी त्यांची धायरी येथे १ हेक्टर ३३.६ आर जमीन विकण्याचा निर्णय घेतला व जाधव यांना याची माहिती दिली. माझ्या तब्येतीचा आणि वयाचा विचार करता मला प्रत्येक वेळी जागा दाखवणे शक्य नसल्याने जाधव याने जागा चांगल्या किमतीत विकण्यासाठी फिर्यादी कडून मुखत्यार पत्र करून घेतले. तसेच एका समझोत्याच्या करारनाम्यावर देखील स्वाक्षरी घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी जाधव याने सदरची मिळकत ७०-८० लाख रुपये मोबदला देऊन घेण्यास खरेदीदार तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा खरेदीदार व त्याचे नातेवाईक जास्तीत जास्त एक कोटी रुपयांना मिळकत घेण्यास तयार असल्याचे सांगितले. ते परदेशात जाणार असल्याने मिळकती संदर्भात निर्णय घ्यायला वेळ लावला आणि त्यादरम्यान इतर जागा मालकांनी न्यायालयातून स्टे आणला तर सदर जागा आपल्याला विकता येणार नाही, अशी भीती दाखविली. व त्यांना एक कोटी रुपयास आरोपींना जमीन विकण्यास भाग पाडले.
काही दिवसांनी फिर्यादीने जागा विक्री संदर्भातील खरेदीखताच्या प्रती तपासल्या. त्यावेळी त्यांच्या मालकीच्या जागेचे मूल्य रेडीरेकनरचा दराप्रमाणे तीन कोटींपेक्षा अधिक असल्याचे व आरोपींनी २१ लाख ३४ हजार ५०० रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचे लक्षात आले. त्यामुळे, फिर्यादी यांनी आरोपी एड. जाधवला हे खरेदीखत रद्द करायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने हे खरेदीखत रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला.
जाधव याने अन्य आरोपींसोबत संगनमत करुन फिर्यादीच्या वृद्धत्त्वाचा व आजारपणाचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन करत दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच, जाधव आणि अभिजीत या दोघांनी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महिलेच्या घराजवळ असलेल्या स्वीस कॅफेत बोलवून घेतले. या महिलेकडे त्यांनी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहूल कोलंबीकर करत आहेत.



