शनिवार, २२ जून
जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचखोर भूमापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ४ लाखापैकी ५० हजार रुपये घेतांना एकाला पकडले आहे.
दौलत मधुकर गायकवाड (वय ३५ वर्षे, भूकरमापक भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, येरवडा, पुणे.) व योगेश्वर राजेंद्र मारणे (वय २५ वर्षे, रा. एरंडवणे, पुणे) या दोन लाचखोर आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या देहूगाव, पुणे येथील जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी लाचखोर आरोपी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचा भुकरमापक दौलत गायकवाड याने ४ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने यासंदर्भात पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानंतर जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी दौलत गायकवाड यांच्या सांगण्यावरून योगेश्वर मारणे याला ४ लाख रुपयांमधील ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबतचा अधिक तपास लाच लूचपतचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.


