शनिवार, २२ जून
न्यायालयीन सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याच्या कारणामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना साथ रोग सुरू असताना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज दरवाढी विरुद्ध आंदोलन केले होते. आंदोलना दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केली होती. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा तसेच वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयापुढे सुरू असून या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना देखील राहुल नार्वेकर हे सातत्याने न्यायालयात गैरहजर राहत असल्याने न्यायाधीशांनी त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.
राहुल नार्वेकर सुनावणीसाठी का हजर राहिले नाहीत, असा सवाल कोर्टाने त्यांच्या वकिलांना केला. पुढील सुनावणीला त्यांना हजर राहण्यास सांगा, असं सक्त आदेश देत कोर्टाने राहुल नार्वेकर यांना ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले असून राहुल नार्वेकर कोर्टाच्या आदेशाचे पालन करून सुनावणीला जाणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


