शनिवार, २२ जून
लोकसभा निवडणूक संपले असले तरी या निवडणुकीचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचे पंटर असलेल्या आणि वरिष्ठांची दिशाभूल करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना अजूनही शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थान का? असा सवाल शिवसेना वाहतूक सेनेचे शहर प्रमुख, माजी उपशहर प्रमुख इम्तियाज शेख यांनी उपस्थित केला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्ष प्रवेश देत उमेदवारी बहाल केली होती. तर विरोधी शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. अटीतटीच्या लढतीत सहापैकी चार मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना तर दोन मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांना मताधिक्य मिळाले. यात वाकचौरे यांचा विजय झाला असला तरी त्यांना अपेक्षित मताधिक्य या मतदारसंघात मिळू शकले नाही.
शिवसेनेतील (ठाकरे) काही गद्दारांनी दुटप्पी भूमिका घेत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात काम केले. स्वतःचे खिसे कसे गरम राहतील या एकाच विचारधारेने एकत्र आलेल्या मंडळींना मुद्दाम एकत्र का आणले गेले? ही सर्व मंडळी निवडणुकीत संशयास्पदरीत्या का वागली? शिवसेनेत नावापुरते राहून ठाकरेंवर आणि महाविकास आघाडीवर सतत टीका करणारे पक्षातील गद्दार भाजपाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाला उपस्थित कसे? भारतीय जनता पक्षाच्या संगमनेर येथील जल्लोष कार्यक्रमात देखील यांची उपस्थिती कशी? भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी निवडीवेळी देखील पक्षातील हे गद्दार कसे उपस्थित राहतात? या गद्दारांचे पुरावे बघून देखील पक्ष कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या अशा दुतोंडी लोकांच्या तक्रारी यापूर्वीच सेना भवनात दिल्या आहेत. मात्र निवडणुक पार पडू द्या, असा सल्ला वरिष्ठांनी दिला होता. निवडणुकीत दिलेली जबाबदारी पार पाडून महायुतीचा मिंधे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. राष्ट्रवादीचे प्रामाणिक कार्यकर्ते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शिवसैनिकांनी आपला उमेदवार विजयी करून दाखविला आहे.
त्यामुळे आता तरी पक्षाने भाजपच्या नेत्यांच्या तालावर नाचणाऱ्या गद्दार भाजप समर्थक लोकांची हकालपट्टी करून शिवसेनेचे पुनर्बांधणी करावी, यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख, संपर्क नेते यांची भेट घेऊन पुराव्यानिशी तक्रार करणार असून भाजपाशी सलगी ठेवणाऱ्या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसैनिकांच्यावतीने पुन्हा केली जाणार असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.


