रविवार, ३० जून
राज्याचा इतिहासात मुख्य सचिवपदी प्रथमताच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून आयएएस असलेल्या सुजाता सौनिक पहिल्या मुख्य महिला सचिव झाल्या आहेत. त्यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे.
सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ लाभणार असून जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. आज संध्याकाळी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेतील.
करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. मनोज सौनिक यांनीदेखील याआधी राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.


