संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते इरफानभाई मन्सुरी यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोणी येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ भाई शेख यांनी या नवनियुक्त कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इदरीस मुलतानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.
इरफानभाई मन्सुरी यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आणि नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीनंतर मनोगत व्यक्त करताना मन्सुरी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार व्यक्त केला. अल्पसंख्याक समाजातील घटकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आणि भाजपचे संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या निवडीबद्दल संगमनेर व अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.