शुक्रवार, ५ जुलै
कर्जाच्या हप्त्यापोटी बँकेत जमा करण्यासाठी दिलेल्या धनादेशावरील रकमेत फेरफार करून धनादेशाची रक्कम स्वतःच्या खात्यावर गोठवून घेतल्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली असून सोबत बावीस हजार रुपयांचा दंडही सुनावला.
अजिज महंमद शेख (रा. महात्मानगर, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात हस्ताक्षर तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची साक्ष नोंदविली गेली.
याबाबत अधिक माहिती अशी, राधाकिसन धीरुराम धांजल (रा. पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी टाटा फायनान्सचे कर्ज घेतलेले होते. त्याचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी आरोपी शेख यास बँक ऑफ महाराष्ट्रच्या पंचवटी शाखेचे ३३ धनादेश तयार करण्यास सांगितले होते. आरोपी अजिज शेख याने ३२ चेक तयार करून त्यावर ‘अकाऊंट पे’ व एका चेकवर स्वत:च प्राप्तकर्ता (सेल्फ) असे लिहिले.


तसेच १६ हजार ४५० रुपयांच्या रकमेत १६ च्या आधी ६ हा अंक लिहिला. त्यामुळे ६ लाख १६ हजार ४५० रुपयांचा चेक बनवून त्याने तो स्वत:च्या खाते असलेल्या महात्मानगर येथील स्टेट बँक ऑफ बिकानेर ॲण्ड जयपूर येथे वटवून घेत अपहार केला होता.
याप्रकरणी राधाकिसन धीरुराम धांजल यांनी नाशिकच्या पंचवटी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत पाेलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सुनीता चितळकर यांनी ११ साक्षीदार तपासले. यात हस्ताक्षर तज्ज्ञ संतोष कान्हेरी यांनी आरोपीचे हस्ताक्षरांसंदर्भात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. विशेषत: सरकारी वकीलांनी कान्हेरी यांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवून घेतली.
आरोपींविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने शेख यास सात वर्षे साधा कारावास व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यातील २१ हजार रुपये तक्रारदारास देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.


